
फाटा
नेहेमीचाच प्रवास
आखीव रेखीव वाट
सगळे कसे व्यावस्थित
चाललेले असते
न थांबतां
बोलावत असतात नेहमी
डोंगराच्या रांगा
कधी अस्वस्थ करतो समुद्र
उसळलेला उफाळलेला
लावलेल्या भातावरच्या
नाजूक हिरव्या लाटा
नदी नाले आणि धबधबे
इशारे करत असतात
पण थांबत नाही आपण
क्षणभर सुध्दा
पण कधीतरी प्रवासात
येतो फाटा एखादा
दिड्ःमूढ करणारा
अनेक वाटा दाखवणारा
पण अर्धवट कच्च्या
काही ढगात गेलेल्या
काही दरीत उतरलेल्या
तर उरलेल्या
अंधारात बुडालेल्या
आणि तिथेच फाट्यावर
बसतो आपण
गोंधळलेल्या अवस्थेत
पडलेल्या असंख्य प्रश्नांची
उत्तरे शोधत
©️ShashikantDudhgaonkar
Beautiful!
LikeLiked by 1 person