दिवाळी आणि आजोळी

मागे राहीलेल्या

आयुष्याच्या काही वळणांवर

पुन्हा पुन्हा जावे

आनंदाचे असंख्य तुषार अंगावर घेत

मायेच्या कुशीत विसावावे

तसा तो खूप मोठा आंनद होता

हे त्याकाळी गावीही नव्हते

दिवाळी आणि आजोळी

समीकरण अगदीच साधे होते

का कोण जाणे

तिथल्या हवेतच माया होती

आजोबा आज्जीला नातवांची

मामाला मावशीला भाचरांची

न आटणारी ओढ होती

दारातून खाली उतरणाऱ्या

दगडी पायऱ्यावर

आणि समोर असणाऱ्या

झाडांवर खेळत

स्व्यंपाक घरातली लुडबूड

छोट्याश्या कळशीने

पाणी भरण्याची हौस

मावशीने गुपचूप

हातावर ठेवलेला लाडू खात

मामाने आणलेल्या

टिकल्याच्या बंदुकीने

ठॅाय ठॅाय करत

दिवस कधी संपायचा

कळायचेच नाही

आणि मग

सांयकाळी जेवण झाल्यावर

बाहेरच्या खोलीत

चादरी अंथरूण

त्यावर पसरून सुरू होणारी

आजोबांच्या, मामाच्या

न संपणाऱ्या गोष्टींची रात्र

©️ShashikantDudhgaonkar