
बालदिन
चौका चौकात मातीत माखलेल्या
पाणी न पाहीलेल्या कपड्यात
झेंडे पेन विकणारी
कधी आपले हात पसरणारी
थंडी वारे पाऊस सोसत
फुटपाथला
किंवा एखाद्या जिर्ण झोपडीला
जग समजणारी
कुठेतरी वाड्यावस्त्यावर
चोरा सारखे लपून राहणारी
समाजाच्या विचारांच्या सीमा सुध्दा
जेथेवर पोहचत नाहीत
अशा ठिकाणी वास्तव्य करणारी
कळण्याच्या आधीच माता बनलेली
एक लहान दुसऱ्या लहानग्याला
कडेवर घेऊन
त्याना पाहून
न पाहील्यासारखे करणारे
जग दाखवणारी
खरच,
काय विचार करत असतील
मोठाल्या गाड्यामधून प्रवास करणाऱ्या
संपन्नतेला पाहून
सभोवतालच्या
चकचकीत इमारतीत राहणाऱ्या
झगमगटाला पाहून
हॅाटेल मधे ताव मारून
बाहेर पडता पडता
तिरस्काराचा
भयंकर कटाक्ष टाकणाऱ्या
त्रूप्त लोकांना पाहून
जगात जन्म घेऊन सुध्दा
जगानेच झिडकारलेल्या
जन्माला येता येताच
मेलेले नशीब घेऊन आलेल्याना
खरच,
काय वाटत असेल
©️ShashikantDudhgaonkar