
असहाय्य
पाऊस खड्डे ट्रॅफीक आणि बूडलेले पूल
अनेक पावसाळे जगून सुध्दा
किती त्याचे कौतूक
दोनचार मैलाच्या प्रवासासाठी
तासभर वेळ खर्च करून
आणि मानसिक कुचंबणा सहन करून सुध्दा
हे असे का
असा विचार नाही येत
आणि येत असला तरी
काही करता येत नाही याची जाणिव
हतबल करून टाकते
विनोदाची झालर लावली की सगळे सुसह्य होते म्हणत
परत परत उदभवणाऱ्या जुनाट रोगासारख्या
पोस्टी लाईक आणि कमेंट पडायला लागतात
सर्वव्यापी आंतरजालावर
त्याच त्या विनोदाचा उबग आला तरी
इमोजी दाखवून खोटे खोटे हसतो आपण
आणि बाह्या सरसावून
जगण्याशी दूराण्व्ये संबध नसलेल्या फुटकळ विषयांवर
निबंधच्या निबंध लिहून झाले की
तलवार काढून सपासप वार करत राहतो
इतरांच्या वॅालवर पोस्ट केलेल्या मजकुरावर
तूंबलेल्या असहाय्यतेला
क्रोधाच्या वाटेने बाहेर काढत
©️ShashikantDudhgaonkar
