शहरी जीवनाचा सापळा
जगात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात. राष्ट्रे एकमेकांसोबत सहकार्य करण्याऐवजी भांडत आहेत, समाजा समाजामधल्या दऱ्या खोल होत आहेत, जागतिक तापमानवाढ आणि तिचे होणारे परिणाम, जागोजागी धुमसत राहणारे संघर्ष जे कधीही भडकू शकतात, युद्धाचे ढग आणि AI चे आगमन, जे अद्याप कोणत्याही अर्थपूर्ण नियंत्रणाखाली आलेले नाही. हे सर्व बदल आपल्या आकलनशक्तीपेक्षा वेगाने येत आहेत. एक धक्का पचवायच्या आत दुसरा दारात येऊन उभा टाकतो. कदाचित म्हणूनच व्यक्ती आपल्या आसपास काय होत आहे या बद्दल औदासिन्य बाळगत आहेत. आजच्या समस्यांना सामोरे आणि भविष्यात ज्यांना सामोरे जावे लागणार आहे, त्या सर्वांबद्दल विचार न करण्याची भावना बळावत चालल्यासारखे वाटत आहे. बदलांची गती आणि अनिश्चितता यांच्यामुळे व्यक्तीनां समंजसपणे प्रतिसाद देणे जड जात आहे. आपल्या आजूबाजूच्या समाजात काय घडते आहे किंवा जगात काय चालले आहे याबद्दल म्हणूनच कोणाला काही पडलेले नाही, आणि पुढेही पडणार नाही. स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी लोकांनी आपल्या क्षितिजांना स्वतःच संकुचित करून घेतले आहे. आणि हे क्षितिज कालांतराने इतके अरुंद झाले आहे की त्यात कसाबसा फक्त त्यांचा स्वतःचाच समावेश आहे. त्यांच्या क्षितीजापलीकडे काय आहे हे त्यांना माहीत नाही, आणि जाणून घ्यायचेही नाही.
स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी लोकांनी आपल्या क्षितिजांना स्वतःच संकुचित करून घेतले आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवन सोपे झाले आहे हे मात्र नक्की. विशेषतः पाणी, स्वच्छता, वाहतूक, दळणवळण, संगणक आणि प्रगत यंत्रांवर गुंतागुंतीची कामे सहजपणे करणे आणि घरगुती उपकरणांमुळे घरकामाचे ओझे कमी होणे. हे फार मोठे आणि वास्तव फायदे आहेत.
पण तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे वाचलेला वेळ शोधायला गेले तर हाताला काहीच लागत नाही. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील लोक, तंत्रज्ञानाशिवायही, स्वतःसाठी जास्त वेळ काढू शकत होते. ते सायंकाळी चार वाजता, फार तर पाच वाजता घरी पोहोचत. व्हरांड्यात बसून संध्याकाळचा चहा घेत, आसपास त्यांची मुलेबाळे गलका करत खेळत असत अथवा शांतपणे अभ्यास करत असत. त्याकाळी लोक लवकर झोपी जायचे व पूर्ण झोप झाल्याने दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होऊन उठायचे. तसेच हुक्की आली की सामाजिक कार्यक्रम, चित्रपट, नाटक अथवा सुट्टीवर जात असत. फारसे नियोजन न करता.
तंत्रज्ञान आणि उपकरणांमुळे वाचलेला वेळ शोधायला गेले तर हाताला काहीच लागत नाही.
सध्या मात्र त्यातली कोणतीच सहजता उरलेली नाही. एवढ्या सुविधा असूनही आपण कामांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या चिखलात रुतलेलो आहोत. त्यात अक्षरशः बुडत चाललो आहोत. एखाद्या संध्याकाळचा बेत किंवा छोटी सहल आखायला लागलो तर ती लगेच डोकेदुखी बनते. कारण त्यासाठी सविस्तर नियोजन लागते. कुटुंबातील सर्व सदस्यांना किंवा मित्रमंडळींना एकाच वेळी सुट्टी किंवा रजा मिळेलच असे नाही.
तंत्रज्ञान दैनंदिन जीवन सोपे करते असे जरी वाटत असले तरी त्याला नियम व अटींचे अदृश्य धागे जोडलेले असतात व ते खरेदीच्या क्षणी अजिबात दिसत नाहीत. प्रत्येक तांत्रिक यंत्र आणि उपकरणाची देखभाल हा त्यातलाच एक भाग. आजकालचे प्रत्येक उपकरण इतके गुंतागुंतीचे असते की ते घरी वा घराजवळच्या दुकानात दुरुस्त करता येत नाही. कॅाल सेंटरला फोन करून त्यांना घरी बोलवावे लागते, वेळ ठरवावी लागते, आणि ते येतात तेव्हा आपली काम सोडून घरात कोणीतरी थांबणे आवश्यक ठरते. पहिली भेट सहसा काय बिघडले आहे हे शोधण्यासाठी असते. मग आठवड्याभराने सुटे भाग हेड ॲाफिस वरून मागवून दुरुस्ती केली जाते. आणि त्यासाठी भरमसाट आकारणी होते.
दुसरे म्हणजे, एकदा या उपकरणांवर आणि सेवांवर आपण इतके अवलंबून गेलेले की त्यांच्या बिघडल्याने आपली नेहमीची कामे अडकून पडतात. यंत्रावर अवलंबून असल्यावर ती बिघडली की चिडचिड सुरू होते.
मग येतात EMI आणि सदस्यता वर्गणी. ती मासिक असू शकतात किंवा वार्षिक. त्यात भर म्हणजे अनेक उपकरणांचे AMC म्हणजे वार्षिक देखभाल खर्च. जे पुरवठादार किंवा कंपनीकडून अपरिहार्य म्हणून सांगितले जातात.
त्यामुळे शहरांतील राहणीमानाचा खर्च साधारणपणे असा राहतो.
- घर मोठ्या किमतीत विकत घ्या आणि आयुष्यभर EMI भरत राहा.
- सोसायटी मेंटेनन्स दर महिन्याच्या कमाईतला मोठा वाटा घेऊन जातो.
- कार किंवा दुचाकी आणि त्यांचे EMI व इंधन खर्च.
- शाळेची फी सरासरी एक लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यावर शाळेची बस, क्लासेस हे वेगळेच.
- वाढत्या आरोग्यसेवा खर्चाचा प्रश्न. अपघात, हृदयविकार किंवा कर्करोग यांसारखा अचानक आजार, विमा नसेल तर मध्यमवर्गीय माणसाला रस्त्यावर आणू शकतो. विमा असला तरी उपचाराचा खर्च विमा रकमेपेक्षा कित्येक पट जास्त होऊ शकतो. त्यामुळे जास्त रकमेचा विमा घेणे भाग पडते आणि पर्यायाने जास्त मोठा हप्ता.
- रोजचा प्रवास, प्रदूषण, मोडकळीस आलेल्या पायाभूत सुविधा यामुळे रस्त्यावरील माणसे चिडचिडी, संतप्त आणि आक्रमक बनतात. हा राग कार्यालयात आणि घरातही येतो. आणि त्यांचे एकमेव शांतता प्राप्त करण्याचे ठिकाण देखील नष्ट होते.
- Swiggy, Zomato, Uber, Blinkit इत्यादींनी गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पण खरे तर ते खर्चाचे ओझेच वाढवतात. घरबसल्या सहज काहीही मागवता येत असेल तर माणूस कशाहीसाठी ऑर्डर देतो. गरज आहे की नाही हा प्रश्न बाजूला पडतो.
आता हे सगळे सहन करतानाही आपल्यापैकी अनेकजण हसतमुख राहतात. एक एक दिवस लढत काढत राहतात. प्रत्येकजण कमावतात, गमावतात आणि महिन्याच्या सुरुवातीला अनेक बिले भरत बसतात. तरीही ते छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत, न हरता पुढे जात राहतात. पण या प्रक्रियेचाही आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होऊ लागतो. हळूहळू शरीरात दाहक आणि ऱ्हासकारक बदल घडत राहतात. मनातील निचरा न झालेला भावनिक गाळ नव्या संवेदना, आनंद आणि भावनांचे मार्ग बंद करत राहतो. आणि उदासीनता आणखी वाढत जाते.
उत्पादकतेने मानवाची गुलामी करावी का मानवाने उत्पादकतेची गुलामी करावी
बदल अटळ आहे. सतत होणाऱ्या बदलांमुळेच मानव उत्क्रांत झाला आहे. त्याला नाकारता येत नाही, नाकारायचेही नाही. पण हे बदल असे घडवता येणार नाहीत का, की लोकांना आपली संवेदनशीलता न गमावता त्यांच्याशी जुळवून घेता येईल? व्यवस्था अशा प्रकारे बदलता येणार नाहीत का की माणसे आपल्या गतीने बदलाशी जुळवून घेऊ शकतील, उपजीविका किंवा सामाजिक स्थान गमावण्याच्या भीतीशिवाय? मोकळा वेळ आणि विश्रांती हा घटनात्मक अधिकार होऊ शकत नाही का? कामाचे तास कमी करणे हे एक चांगले पाऊल ठरेल. उत्पादकता थोडी कमी होईल कदाचित. पण आपण एक मूलभूत प्रश्न विचारायला हवा, किती दिवस आपण केवळ उत्पादकतेचाच विचार करत राहणार? मानवी जीवन म्हणजे केवळ उत्पादकता, नफा आणि शेअर बाजारातील झपाट्याने बदलणारे आकडे एवढेच आहे का? आपण कशाचे उत्पादन करतो आणि कोणासाठी, एवढ्या वेगाने? ५०% पेक्षा जास्त उत्पादन म्हणजे निरर्थक, प्लास्टिकी वस्तू ज्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किंवा मॉलमध्ये “आली लहर केला कहर” ह्या भावनेने विकत घेतल्या जातात. आणि त्या वर्षभरात भंगारात देखील जातात.
“उत्पादकतेने मानवाची गुलामी करावी का मानवाने उत्पादकतेची गुलामी करावी”, हा प्रश्न आता मोठ्याने व वारंवार विचारायला हवा. नाहीतर मानवी समाजाचे रूपांतर एका प्रचंड मोठ्या वारुळात होईल जिथे मुंग्यासारखे मानव दिवसरात्र धावत राहतील, कुठल्याही विश्रांतीशिवाय कष्ट करतील, फक्त त्या वारूळाची देखभाल करण्यासाठी अन्यथा ते कोसळून पडेल.
