डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जातीव्यवस्था आणि आपला दुभंगलेला समाज
अत्यंत ज्ञानी, द्रष्टा, निर्भीड, बंडखोर व भारतीय समाजाच्या गुंतागुंतीचे सखोल भान असणारे महापुरूष
डॅा बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी वंदन.
महापुरुषांची “वाटणी” आणि जातीचा अभिमान
भावनांनी ओथंबलेल्या अभिवादनांचा महापूर आहे – पण फक्त ठराविक नद्यांना. का? ज्या जाती व्यवस्थेच्या अंतासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, तीच व्यवस्था त्यांना एका ठराविक गटाचा नेता म्हणून मर्यादित करते.
बर असे का होते? वरवरचे कारण म्हणाल तर भारतीय समाजात खोल रूजलेल्या व जाणिपुर्वक जपलेल्या उतरंडी मुळे, समाजाचा प्रत्येक तुकडा आपआपला एक वेगळा महापुरुष पुजत असतो. भारतातील सर्व थोर महापुरूषांची “एक तुझा, एक माझा आणि एक त्याचा” अशी वाटणी समाज करून टाकतो. आपल्या जातीचा तो आपला आणि तोच सर्वश्रेष्ठ.
इतर महापुरूष असतील श्रेष्ठ पण आमच्या साठी एकच. कधीकधी तर “आमचाच श्रेष्ठ”, किंवा “या महापुरुषाचे उगाच स्तोम माजवले जात आहे”, किंवा यांचे “कर्तृत्व काय” किंवा “त्यांनी आमच्यासाठी काय केले” वगैरे टोमणे हळूवार आवाजात
प्रत्यक्ष ऐकू येतात व समाजमाध्यमांवर तर ही टोकाची मते प्रचंड मोठ्या आवाजात मांडली जातात. बर हे एका ठराविक गटाचे मत आहे असे नाही तर सर्वच गटांचे एकमेकांच्या महापुरूषांबद्दलचे मत, थोड्याफार फरकाने असेच आहे.
शिक्षित व विचारी व्यक्तींना कल्पना असते की प्रत्येक महापुरूषाचे एक विशिष्ट योगदान आहे आणि त्या योगदानामुळे आपल्या देशाला व समाजाला एक प्रकारची तात्विक व वैचारिक समृध्दी लाभलेली आहे. त्यामुळेच आपण आज जेथे आहोत, तेथपर्यंत पोहोचू तरी शकलो. परंतू जात्याभिमान त्यांना ते आत्मसात करू देत नाही आणि आत्मसात केले तरी त्याची जाहीर वाच्यता करू देत नाही.
आपण समाज म्हणून दुभंगलेले आहोत आणि तसेच राहण्याची दाट शक्यता आहे.
हाच दुभंगलेपणा आपल्या नागरिकांना एक व्यक्ती म्हणून परिपूर्ण जिवन जगू देत नाही. पूर्वग्रह व पोकळ अभिमानामुळे आपण समग्र प्रगती करू शकत नाही; अतिप्रगत सोडा, आपण प्रगत देशाशी सुध्दा बरोबरी करू शकत नाही.
सुपर पावरची स्वप्ने आणि वास्तवाचा धक्का
स्वप्न मात्र आपली फार मोठी असतात, जगातील सुपर पावर होण्याची व जगाला ज्ञान देण्याची फार मोठी आस आहे आपल्याला. कसल्या आधारावर ही स्वप्ने पाहीली वा दाखवली जातात, कोण जाणे. भारताच्या कुठल्याही राज्यात राज्य परिवहन मंडळाच्या बसने वा रेल्वेने प्रवास करून या, तेथील काही गावात व शहरात २–३ दिवस राहून पायपीट करा; मग बघा वास्तव कसे अंगावर येते ते.
ही परिस्थिती जास्त वेदनादायक आहे कारण डॅा. बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेक सामाजिक नेते व सुधारकानी समाजातील आर्थिक व ज्ञानाची विषमता दुर करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. तरीही जातीपाती मधे विभागलेला समाज हे समजून घेत नाही की समाजातल्या तळागाळातील लोकांची प्रगती केल्यास संपुर्ण समाजाचा स्तर उंचावला जातो.
एकांगी व स्वतःपुरता विचार करूणारे आपण ह्या विषम व्यवस्थेला बळ देत आहोत, ह्याचा अजिबात विचार करत नाहीत. अर्थात हे सर्व जातीपातीना लागू आहे. कारण स्वार्थ आणि गलिच्छ राजकारण त्यातले बरेच महाभाग खेळत असतात. व्यवस्थेमधे संख्येने जास्त व अधिकारपदांवर असलेले लोक जास्त यशस्वी होतात, हे कळायला फार हुशारी लागत नाही.
असो, शब्द प्रपंच एवढ्याचसाठी की वरवरचा उत्सवी, उल्हासी व आत्मप्रौढीचा फुगवटा एकदा का दृष्टीआड केला की आपले मध्ययुगीन वास्तव स्पष्ट दिसायला लागते. २०२५ वर्ष संपत आले तरी आचार व विचाराने आपण १०२५ मधेच नांगर टाकून बसलो आहोत, हे उमजते.
स्वतःला विचारायचे काही प्रश्न
- एखाद्या व्यक्ती प्रती आपली वर्तणूक, त्या व्यक्तीची श्रीमंती, गरीबी, जात, धर्म, भाषा, प्रांत हे विषय नजरेआड करते का?
- मानवाने मानवाशी वागताना धारण करायची मुलभूत मानवता आपण व्यक्ती परत्वे बदलतो का?
- जाणिव, सहानुभूती व सहवेदना, आपण निवडकपणे वापरतो का?
वरील तीन प्रश्नांपैकी एक जरी उत्तर “नाही” असले तर समाज व देश म्हणून आपण प्रगल्भ झालेलो नाही. अजून खुप मोठा पल्ला आपल्याला गाठायच्या आहे. सुपर पावर सोडा, नागरीकी जिवनातल्या शांतता व शिस्तीच्या बाबतीत आपण पाश्चिमात्य देशांच्या जवळपास सुद्धा पोहोचलेले नाहीत.
जातीअंत, विषमता आणि जीडीपी
ता. क. जातीअंताची लढाई ही विषमते विरूध्दची लढाई सुध्दा आहे. ही लढाई सद्यस्थितीतील जीडीपी ह्या महत्वाच्या विषयाला एक वेगळे परिमाण देते.
जीडीपी म्हणजे चलनाचा चयापचय. जेवढा चलनाचा चयापचय जास्त, तेवढी जीडीपी जास्त. आर्थिक विपन्नावस्थेतील समाजाचा मोठा भाग जीडीपी मधे फारशी भर घालू शकत नाही. परंतू त्यांची आर्थिक उन्नती झाल्यास ते सेवा व वस्तूंवर जास्त खर्च करू लागतील. याचाच अर्थ चलनाचा चयापचय वाढेल व जीडीपी सुध्दा वाढेल.
दुसरे म्हणजे, सेवा व वस्तू जास्त खपू लागल्यास त्या क्षेत्रात आणखी रोजगार उपलब्ध होईल व हळूहळू देश अत्यंत उन्नत अवस्थेत जाईल.
इतर लेख व कविता
