भगीरथाचे वशंज
पावसाचे काय
येतो वेळी अवेळी
उन्हाळा संपला की
उन्हाळा मात्र संपता संपत नाही
शहरात उन्हाळा भाजतो
पावसाळा काही तेवढे दिवस भिजवत नाही
कधीतरी चार आठ दिवस धोधो कोसळतो
उन्मळून पडतात झाडे
मुळे छाटलेली
मोठमोठ्या इमारती सिमेटचे रस्ते आणि फुटपात बांधताना
सुंदर शहरासाठी
करावे लागते असे काहीबाही
कोठेतरी रात्री दहाबारा वाजता
सालबादाप्रमाणे
कोसळते भिंत एखादी
दहावीस घरांची चूल
कायमची विझवून टाकत
कधी एखादा जुना वाडा
तर कधी अर्धवट बांधलेली इमारत
वाढवतात आकडा भर टाकून
तुंबतात गटारे प्लास्टीक पिशव्यानीं
रस्ते अदृष्य होतात
उरतात दुभाजकांचे शेंडे
तटस्थपणे उभे असणारे
स्वर्गातून अवतरलेल्या नद्या
नव्या जोमाने वाहू लागतात
भगिरथाच्या वंशजाना
मुक्त करण्यासाठी
©️ShashikantDudhgaonkar
