मिरवणूक

मिरवणूक

स्पिकर्सच्या उंचच्या उंच चवडीतून निघणारा

गगनभेदी आवाज

चकमक चकमक करणारे लेझरचे झोत

स्त्री पुरूष लहान आणि थोरांचे

अगम्य पदलालित्य

रस्त्यावरून वाहणारी नदी

उल्हासाने झिंगलेल्या चेहऱ्यांची

सरकते पुढे

इंचाइंचाने

रस्त्याच्या कडेला थांबलेले

त्रयस्थपणे बघत राहतात

कोंडीमुळे वैतागलेले

निर्विकार चेहऱ्यामागे लपवतात

आपली चीडचीड

आसपास राहणाऱ्यानीं

आत येऊ पाहणारा कोलाहल रोखण्यासाठी

घट्ट बंद केलेल्या असतात खिडक्या

काही लोकांना आवाज आवडत नसतो

तर काहीनां आवाज करणारे

आवडत्या आणि नावडत्या रंगात

महापुरूष सुध्दा रंगतात

मिरवणूकांचे झेंडे येथे

तारखेनुसार बदलतात

आजकाल जातपात कोणी मानत नाही

कमीतकमी म्हणतात तरी ठामपणे

पण अजून तरी उपेक्षेची जागा

सदभावनेने व्यापलेली नाही

हद्दपार करून द्वेषाला

बंधूता अजून रूजलेली नाही

पाताळातून आकाशात पोहचणाऱ्या

जन्मापासून मरणांपर्यंत पुरणाऱ्या

अनेक रंगांच्या अनेक छटांच्या

माणसा माणसांत उभ्या येथे

असंख्य अदृश्य भिंती

कधीकधी एक भाबडा विचार

येतो माझ्या मनात

बर्लिनच्या भिंतीसारखे उध्वस्त

होतील का त्या क्षणात

मग व्यावहारात मुरून वातड झालेले माझे मन

समजावते स्वःताला

दगडवीटांच्या सोप्या असतात रे

भिंती पाडायला

मनामनातल्या भिंतींना सुरूंग तू

कसा लावणार

©️ShashikantDudhgaonkar

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading