अमावस्या
दिसायची चंद्रकोर तरी
नित्यनेमाने
पौर्णिमेचे रूप पाहून
अडकायचा श्वास
छातीतल्या छातीत
बिघडायचा ठेका
हडबडलेल्या हृदयाचा
तोल सावरतां सावरतां
गडबडायचे पाय
आणि पापण्या विस्फारून
एकटक पहायचो
साठवायला डोळ्यात
तुझ्या गालावरच्या खळीमधून
उसळणारे
डोळ्यातून सांडणारे
मोहिनी घालणारे स्मितहास्य
कानात रूंजी घालणारा
तुझा नाजूक आवाज
आणि तू
दृश्य आणि अदृश्य
सध्या मात्र माझ्या आकाशात
अमावस्या कायमची
की आकाशात दाटला आहे
कधीही न विखूरणारा
काळा ठिक्कर मळभ
