
खिडक्या
मी बंद केला खिडक्या
घराच्या माझ्या
नकोशी झाली होती भगभग
बाहेर लागलेल्या वणव्याची
विखार आणि वेदनांच्या
ठिणग्यांनी पेटवलेला
फुटकळ वाटू लागल्या होत्या
शाब्दिक लढाया
डाव्या उजव्या आणि मधल्या
अनेक विचारसरणींच्या
कोणी मागे सरकत नव्हते
कोणी पुढेही जात नव्हते
शब्दांचे बाण
दोघांच्या मधे सुध्दा पोहचत नव्हते
सहन होत नव्हते विव्हळणे
न वाहणाऱ्या आसवांचे
आणि विजयी जल्लोष
लुटपुटीच्या लढाया जिंकलेल्यांचे
बघवत नव्हता बकालपणा
आसपासच्या वस्त्यांचा
चोरून घरात घुसू पाहणारा
आणि मी बंद करत गेलो खिडक्या
एक एक करत
मनाच्या सुध्दा
©️ShashikantDudhgaonkar
