परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि आणखी परीक्षा

सध्या NEET, UGC-NET आणि NEET-PG परीक्षा गैरप्रकाराच्या संशयामुळे गाजत आहेत. त्यापेक्षा माझा मुद्दा जरा वेगळा आहे. मला असे म्हणायचे आहे की मुळात ह्या अनेक प्रकारच्या प्रवेश परीक्षांची कितपत गरज आहे ?

या विषयांवर लिहीताना मी आमच्या काळी म्हणजे मी कॅालेजला प्रवेश घेतला (१९८६) त्या दरम्यानच्या काळाचे आणि आत्ताच्या परिस्थितीची तूलना करतो. खरे तर अशी तूलना करू नये. कारण काळासह बऱेच बदल होत राहतात. ते आपल्याला अंगिकारावे लागतात. पण तरीही ही तूलना करावीशी वाटते. कारण त्याशिवाय आज मुलामूलींच्या आयुष्यात काय घडत आहे हे आपल्याला कळणार नाही.

त्या काळच्या काही ठळ्ळक गोष्टी

1. दिवाळीची, नाताळाची आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे शुध्द सुट्टी, कसलाही अभ्यास नाही. उन्हात खेळणे, कथा कादंबऱ्या वाचणे, कॅरम, बुध्दीबळ, लूडो खेळणे व रहात असलेला परिसराची माहीती करून घेणे

2. कसलाही क्लास अथवा शिकवण्या नसायचा. असलाच तरी त्या शिकवणी मधे ४-५ पेक्षा जास्त विद्यार्थी नसायचे. त्या मधे, गृहपाठ करून घेणे व घोकंपट्टी करून घेणे येवढेच असायचे. त्या शिकवण्यांचे आताच्या क्लासेस सारखे ब्रॅंड नव्हते. साधारणपणे घरगुती क्लासेस वा शिकवण्या होते त्या.

3. अभ्यास करा हे घरच्यांचे सांगणे असायचे. पण दुराग्रह नव्हता.

4. अगदी दहावी, अकरावी व बारावीच्या सुट्ट्यात सुध्दा पुस्तकानां बघितले जायचे नाही.

5. गाईड हा पुस्तकांचा प्रकार त्याकाळी होता. गाईड मधे शालेय पुस्तकातली प्रश्न व त्यांची उत्तरे रेडीमेड मिळायची. पण गाईड वापरणे कमीपणाचे लक्षण समजले जाई. सर्व प्रश्नांची स्वःताच्या मनाने उत्तरे लिहीण्यावर भर असायचा.

6. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, पोहणे याच्यां क्लासेसचे फॅड परिसिमेला पोहचले नव्हते. कारण हे सगळे आम्ही मित्रमंडळीकडून सहज शिकायचो.

7. कोठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास कूठलीही प्रवेश परिक्षा नव्हती. दहावी अथवा बारावीचे गुण हेच प्रवेशासाठी सगळीकडे प्रमाण धरले जायचे. त्यामुळे प्रवेश परिक्षा व त्यांचे क्लासेस यांचे ओझे नव्हते. आम्ही मुक्तपणे बालपण अनुभवले व त्याचा पुर्ण आनंद घेतला.

अर्थात याला अपवाद होते. पण सर्वसाधारणपणे अशी परिस्थिती होती.

आता आजची परिस्थिती पाहूया

1. आठवी नववी पासून विद्यार्थ्यांच्या सर्व सुट्ट्या (दिवाळी, नाताळ व उन्हाळा)ह्या ब्रॅंडेड कोचींग क्लास मधे सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत बाकड्यावर व्यतीत होतात. अशा सलग शिकवण्याने किती ज्ञान डोक्यात जाते हा एक मोठा प्रश्न आहे. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या वयातली नैसर्गिक खेळण्याबागडण्याच्या उर्मीला निष्ठूरपणे मारले जाते. करियर ह्या गोंडस नावाखाली.

2. आजकाल प्रत्येक विद्यार्थी वर्षभर कोणत्या ना कोणत्या कोचींग क्लासला जात असतात. त्या क्लास मधे एकावेळी एक शिक्षक व ४० ते ७० विद्यार्थी असतात. शालेय अभ्यासक्रम परत एकदा नव्याने शिकवला जातो. पण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेत असतो त्यामुळे शाळेत चालू असलेले धडे व क्लास मधे घेतलेले जाणारे धडे यामधे काही संबध नसतो. विद्यार्थी शाळेत एक धडा व क्लास मधे दुसरा धडा, यामधे पिचले जातात.

3. प्रवेशपरिक्षेचे आणखी वेगळे क्लासेस. JEE चे क्कोचींग लासेस आजकाल ५ वी पासून सुरू होतात. NEET चे आठवी पासून.

4. वेळ उरला तर हौशी पालक पाल्याना क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, इत्यादीचे क्लासेस लावतात. खरे तर, ज्या गोष्टीतून मुलांनी आनंद घ्यायचा त्या गोष्टी रूक्ष आणि रटाळ करून टाकतात.

5. हे सर्व पाहीले तर एक लक्षात येईल की आजकालचे विद्यार्थी हे सकाळी ६.३० ते रात्री ८-९ पर्यंत घराबाहेर असतात. शनिवार रविवार सुध्दा त्याना मोकळीक नसते. निवांतपणा तर नाहीच नाही. सतत घाण्याला लावलेल्या बैलासारखे गोल गोल फिरत राहतात.

6. तूलनाः आजकालच्या मुलामूलीनां इतरांशी होणाऱ्या तूलनेला कायम तोंड द्यावे लागते. “तो बघ त्याला किती चांगले मार्क आहेत”, “ती बघ किती छान गिटार वाजवते”, इत्यादी. ह्या पालकांच्या इर्षेपोटी त्याला अजून एखादा क्लास लावला जातो.

7. अनेक प्रकारचे कोचींग क्लासेस व प्रवेशपरिक्षेच्या दबाव, पालकांचा दबाव, समाजाचा व गणगोतांचा यशस्वी होण्याचा दबाव व इतर दबाव त्यांच्यावर हळूहळू परिणाम करू लागतात. ज्या वयात फारश्या जबाबदाऱ्या नसाव्यात व जगण्यात एक सहज मोकळेपणा असावा, त्या वयात ही मुले प्रचंड ओझ्याखाली वावरू लागतात.

हे असे आपल्या पाल्या संदर्भात होणे बरोबर आहे का ? समाजातील सर्व मुलांमूलीं बाबत असे होणे योग्य आहे का. कधीतरी विचार करायला हवा की आपण त्यांचे किती हाल करतोय. उमलण्याआधीच कळ्या करपवून टाकतोय. कोमेजलेले आयुष्य त्याना भेट म्हणून देतोय. ह्या विषयावर आपण गंभीरतेने विचार करणार आहोत का ? स्पर्धेच्या नावाखाली मुलामूलींच्या होणाऱ्या अक्षम्य पिळवणूकीकडे दुर्लक्ष करणार आहोत का? प्रौढ आयुष्य जगणे सोपे माही हे शिकवण्यासाठी त्यांचे बालपण अत्यंत अवघड करणार आहोत का ?

खरे तर, माझ्या लेखी त्यांच्यात आणि बालमजूरांमधे काहीच फरक नाही.

©️ShashikantDudhgaonkar

ता.क. आणि आमच्याकाळी फार अवघड होते, परिस्थिती फार वाईट होती, वगैरे कथा तर मुलांना सांगूच नये. कारण आपल्या काळापेक्षा आजच्या मुलांमुलींची परिस्थिती अत्यंत खडतर आहे. भविष्य घडवण्याच्या भव्य विचारामागे फरफटत जाता जाता, त्यांचे वर्तमान मात्र ते हरवून जात आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading