वाडा मनाचा

वाडा मनाचा

सोसतच असतो वाडा

पडका मनाचा

वारा कधी पाऊस

कधी आग ओकणारे उन

आतून बाहेरून भाजून काढणारे

तर कधी तुफान

उध्वस्त करणारे

उधळून लावणारे इमले सारे

भाव भावनांचे आठवणींचे

रचलेले वेचलेले जपून ठेवलेले

भिंतीतल्या देवळीत

पालपाचोळ्या सारखे उडत जाते

वावटळी बरोबर

परत कधीच न दिसण्यासाठी

पण कधीतरी दरवळते

रातराणी दिवसाही

कधीतरी हळूवार झुळूक

वाहते ध्वस्त वाड्यातून

भग्न भिंतीना स्पर्श करत

म्रुदू मुलायम मायेचा

कौतुकाचा प्रेमाचा

हवाहवासा वाटणारा

आल्हाददायक स्पर्श

आणि मग उभा राहतो वाडा

डागडुजी करून

रंगरंगोटी करून

परत नव्याने

आणि नव्या जोमाने

नवे क्षण अनुभवायला

नव्या आठवणी साचवायला

आणि त्यानंतर येणारे

नवे तुफान पण झेलायला

निमुटपणे

ध्वस्त भग्न होण्यासाठी

परत एकदा

©️ShashikantDudhgaonkar

Leave a Comment

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading