हरवलेल्या सावल्या







हरवलेल्या सावल्या | Shashikant Dudhgaonkar


हरवलेल्या सावल्या

वेगात धावणाऱ्या काळासह
सतत चालून
वाटा रूंद होऊ लागतात
रूळतात
सहज सोप्या होत जातात
सांगणारे सांगत असतात
वेळोवेळी
पायाखालच्या वाटेने मात्र
ते ऐकलेले नसते कधी
अन वाटेची लय
आणि आपला ठेका
काही केल्या जुळत नाही

दिवस मागे जातात
काळ पुढे पळत राहतो
पेटीत जपून ठेवलेले कापडे
विरतात
फाटतात घातलेल्या घडीवर
धुसर होऊ लागतात मनातल्या
अनेक चांगल्या आठवणीं
आसऱ्यासाठी जपलेल्या
वर्तमानातल्या अस्वस्थ क्षणांसाठी
आजच्या उन्हाला मात्र
कालचे ढग सावली देऊ शकत नाहीत
तरीही मागे शोधत राहते मन
एखादा ढग, एखादे झाड
गारव्यासाठी
बऱ्याचदा उन्हाचा दाह सुध्दा
फारसा भाजत नाही
पण पायाखालच्या वाटेने
विचारलेले असतात प्रश्न
उत्तर नसते ज्यांचे
आपल्याकडे आज तरी

©️Shashikant Dudhgaonkar


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading