खडतर हा प्रवास

वळणांनी भरलेला

मैलोमैल खडकाळ

कडक उन्हातला

पान सुध्दा नाही

सावली साठी

नदी नाही ओढा

चढ सुध्दा संपत नाही

संपत आलाय शिधा

मोकळी गाठोडी

थेंबा थेंबासाठी आता

हमरातूमरी

दमले भागले वाटाडे

रागावलेत खूप

मागच्यांवर खापर फोडत

शमवतात भूक

भुतकाळाचे दाखले देत

वाजवतात सूप

उज्वल भविष्याचे

डोळसांनी झाकले डोळे

शहाणे झालेत वेडे

पण तरीही

हरवलेली वाट

अन् वाटाड्यांचा घाट

कळू लागला आहे

हळूहळू

पण चुकलेल्या वाटेवरच

चालत आहेत

फसलेले वाटसरू

थबकलो असतो मागेच

फाट्यावर थोडा

घेतला असतां कानोसा

थांबून पुढचा

ऐकले असते म्हातार्याचे

अजीजीने सांगणार्या

चटपटीत बोलणार्यांवर

भाळलो नसतो जरा

तर कदाचीत दुसर्या वाटेने

पोहोचलो ही असतो

एव्हाना

इप्सीत स्थळी

©️ShashikantDudhgaonkar