आजकाल शहरामधे रात्रीच्या आकाशात तारे फारसे दिसत नाहीत, कारण light pollution. शहरातील उजेडामुळे भरपूर तारे दिसणे अवघड झाले आहे. खालील ओळी ह्या तारे न दिसण्याच्या दुसर्या कारणांचा फक्त एक काव्यात्मक विचार आहे.

चांदण्या

फारश्या चांदण्या दिसत नाहीत

आजकाल रात्रीच्या आकाशात

लहानपणीचे आकाश

भरलेले असायचे चांदण्यानीं

आजी म्हणायची

लोक मेल्यावर त्यांच्या चांदण्या होतात

मग आजकाल मरत नाहीत का लोक

का मेले तरी आकाशात जात नाहीत

आणि भटकत राहतात येथेच कोठेतरी

तेल मागत अश्वथमा सारखे

की आकाशात झेप घेण्याची ताकद

उरत नाही त्याच्यांत

आणि विझतो त्यांचा प्रकाश

कणाकणाने जिवंतपणीच

©️ShashikantDudhgaonkar