युध्द

युध्दात मरतच असतात

तसे सैनिक थोडे फार

पण सगळेच नाही काही

फक्त थोडे फार

जरी मरण स्वस्त असले

कुठल्याही युध्दात

तुमच्या आमच्या सारखे सुध्दा मरतात

क्षेपणअस्त्राच्या हल्ल्यात

फार नाही काही

फक्त थोडेफार

इतके काही वाईट नसते

युध्द

कधीतरीच होणारे

स्वप्ने सुध्दा धुळीस मिळतात

अनेक लोकांची

पण यातना घेतातच तत्परतेने

जागा स्वप्नांची

शांततेचे काय कौतुक करता

ती सुध्दा झुकते

महत्वाकांक्षेच्या ओझ्याखाली

तडफडून मरते

महान थोर नेते

तसे कनवाळूच असतात

पण इतिहास रचण्यासाठी

आणि बदलण्यासाठी भुगोल

युध्दाचा खेळ

तसा अनिच्छेनेच खेळतात

©️ShashikantDudhgaonkar