प्रॅामीस डे





प्रॉमिस डे | मराठी कविता | शशिकांत दुधगावकर




प्रॉमिस डे

प्रॉमिस डे च्या दिवशी
काही तरी वचन द्यायला हवे
वचन नाही तर नाही, शब्द तरी
कमीतकमी पंख लावून
भावना तरी पोहचवाव्यात

का तसे काही नसते
वा नसावे
की एक पडलेला पायंड्याचा ढोल
वाजतात जागोजागी
मी पळवाट शोधतो
मनातल्या मनात

पलायन करणे नसते मनात कधीच
खरेतर
गुलमोहराला आग लागायची
वाट पाहतोय मी
लाल भडक फुलांची

वाट बघत किती तरी वचनांच्या
मी जाळल्या चिता
वाळलेल्या गवतासारखे
जळतात लगेच शब्द
मात्र मी मला दिलेले स्वतःला
त्यांच शब्दांची
नेमकी राख झाली

तीला मात्र
कधीच काहीच वचन दिलेले नाही
शब्द सुद्धा नाही
भावनेच्या ओलाव्यात
चिंब झालेले शब्द
ओठांतून बाहेरच पडले नाहीत
एकादी ओझरती नजर
डोळ्यातून निसटते कधीकधी
बेसावध क्षणी

ती नसली की आठवते
ती
आणि ती नसली तरी आठवते
ती
आणि कधी भेटली की
दिसते फक्त
ती

अबोल शब्दांच्या खेळात
अव्यक्त भावनांची मात्र
होते होळी

© Shashikant Dudhgaonkar
इतर लेख व कविता :
When the Waves Fall Silent
Illumination
The Baseline
संदर्भ : Promise as a concept


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading