हार्ट अटॅक(हृदयविकाराचा झटका)






व्यायाम, ताणतणाव, झोप आणि हृदयविकाराचे झटके | डॉ. शशिकांत दुधगावकर


🫀 व्यायाम, ताणतणाव, झोप आणि हृदयविकाराचे झटके

– डॉ. शशिकांत दुधगावकर

व्यायामाची कारणे आणि हृदयविकार

आपल्या सर्वांना तंदुरुस्त राहायला आवडते आणि त्याबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समजुती व कल्पना असतात. काही खऱ्या, काही खोट्या तर काही काल्पनिक.

लोक व्यायाम का करतात?:

  • पोट कमी करणे
  • चांगले दिसणे
  • अधिक ताकदवान होणे
  • वजन कमी करणे
  • व्यायामचा आनंद घेणे

काहींजण हृदयविकार टाळण्यासाठी व्यायाम करतात, काहींना हृदयविकार झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा लागतो. काहीजण सोपस्कार म्हणून व्यायाम करतात, काही आनंदाने, तर काही रडत-खडत व्यायाम करतात.

आणि हो, व्यायाम मदत करतो – भरपूर मदत करतो!

परंतु फक्त व्यायाम केल्याने आरोग्य राखले जाते का?
हृदयविकार टाळला जातो का?
तर उत्तर नाही असेल.

तरुण व तंदुरुस्त लोकांना हृदयविकाराचे झटके का येतात?

आपण वर्तमानपत्रात बऱ्याचदा वाचलेले असते की अगदी तरुण, वरवर पाहता निरोगी व्यक्तींनाही हृदयरोगाचे झटके येत आहेत. त्यांनी व्यायाम केलेला असतो, आहार संभाळलेला असतो, तरीही…

याचे कारण:
हृदयविकार (heart attack) कुठल्याही एकाच कारणाने होत नाही. हा आजार अनेक घटकांवर अवलंबून असतो आणि अनेक कारणांमुळे होऊ शकतो.

हृदयविकारासाठी जबाबदार घटक

🧬 आपल्या हातात नसलेले घटक:

  • वय – पुरुषांसाठी ४५ नंतर, स्त्रियांसाठी ५५ नंतर जोखीम वाढते
  • कुटुंबातील इतिहास – आई, वडील वा बंधूंना हृदयविकार झाल्याचा इतिहास
  • पुरुष असणे – स्त्रियांमधील हार्मोन्स हृदयविकारापासून बचाव करतात

🛠️ आपल्या हातात असलेले व बदलता येऊ शकणारे घटक:

  • धूम्रपान
  • अयोग्य आहार
  • व्यायामाचा अभाव
  • अति मद्यपान
  • लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल
  • दीर्घकालीन ताणतणाव
  • अयोग्य वा कमी झोप

१. मानसिक ताणतणाव आणि हृदयाचे आरोग्य

ताणतणाव हृदयाला कसा हानी पोहोचवतो?

दीर्घकालीन तणावामुळे एपिनेफ्रिन (अॅड्रेनालाईन) सतत स्राव होतो. यामुळे:

  1. हृदयाच्या धमन्यांच्या आतील अस्तराची हानी होते व त्यांचा नैसर्गिक गुळगुळीतपणा कमी होतो वा त्या रखरखीत होऊ लागतात. अर्थात हा बदल सगळ्या रक्तवाहिन्यांमधे होतो असे नाही. परंतू महत्वाच्या म्हणजे मेंदू वा हृदयाला रक्त पोहचवणाऱ्या रक्त वाहिन्यात हे बदल होण्याची दाट शक्यता असते.
  2. प्लाकची निर्मिती – आतून रखरखीत झालेल्या धमन्यांवर चरबीचे (कोलेस्टेरॉलचे) थर जमू लागतात
  3. रक्तवाहिनीचा घेर कमी होणे – प्लाकमुळे रक्तप्रवाहाची जागा कमी होते
  4. हार्ट अॅटॅकचा धोका – रक्ताची गुठळी प्लाकमुळे घेर कमी झालेल्या रक्तवाहिनीमधे अडकल्यास किंवा प्लाक तुटल्यास हृदयाचा रक्तप्रवाह थांबू शकतो. ज्यामुळे हृदयाचे रक्तभिसरणाचे कार्य कमी होऊन हार्टअटॅक येतो.

मानसिक ताणतणावाचे इतर वाईट परिणाम:

  • हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद करणे
  • रक्तदाब वाढवणे
  • संपूर्ण हृदय व रक्तसंचार यंत्रणेतील कार्यक्षमता कमी करणे

फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडीसह अनेक शोधनिबंधांनी याची पुष्टी केली आहे.

लक्षात ठेवा:

अधूनमधून राग येणे किंवा चिंता वाटणे वाईट नाही.
परंतु सतत भावनिक अशांततेत राहणे, रागरागात करणे, चिडचिड करणे, अती उत्तेजित राहणे किंवा आतल्या आत कुढत जगणे, चांगले नाही.

यामुळे आपले मानसिक आरोग्य तर बिघडतेच परंतु शारीरिक आरोग्य सुद्धा हळूहळू नष्ट होऊ लागते.

जीवनाचा सुत्र

“हे देवा, मला जे बदलता येत नाही (परिस्थिती, घटना) ते स्वीकारण्याची मनःस्थिती व मनशांती दे,
जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकत दे
आणि काय बदलता येते व काय नाही यातील फरक ओळखण्याची बुद्धी दे.”

२. झोप: हृदयाचे पुनरुज्जीवन करणारी शक्ती

झोपेचे महत्त्व

झोप ही केवळ विश्रांतीची वेळ नाही.
झोपेत शरीर सक्रियपणे कार्य करत असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर स्वतःच स्वतःची दुरुस्ती करत असते.

खराब किंवा अपुऱ्या झोपेमुळे होणारे धोके:

  • उच्च रक्तदाब
  • मधुमेह आणि वजन वाढणे
  • मानसिक तणावाला चुकीचा वा अतिशयोक्तिपूर्ण प्रतिसाद
  • अनियमित हृदयठोके

चिंताजनक तथ्य:

रात्री ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने हार्ट अॅटॅकचा धोका २०-३०% वाढतो.

काहींना स्लीप एप्निया (Sleep Apnea) हा आजार असतो.
मात्र स्लीप एप्निया सारखे झोपेचे विकार थेट हृदयाच्या समस्यांशी जोडलेले आहेत.
त्यांच्या योग्य उपचारामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

मुख्य मुद्दा:

झोप हा व्यायाम आणि आहाराइतकीच हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
दररोज ७-९ तास शांत झोप घेण्याचे लक्ष्य ठेवा.

✅ निष्कर्ष

व्यायाम महत्त्वाचा आहे – पण खरे हृदयाचे आरोग्य म्हणजे:

  1. ताणतणावाचे व्यवस्थापन
  2. झोपेला प्राधान्य देणे
  3. जीवनशैलीतील धोक्यांवर लक्ष ठेवणे

यानेच संपूर्ण हृदयाचे आरोग्य राखता येते.

©️ Dr. Shashikant Dudhgaonkar


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading