
देवमाशाचे गाणे
समुद्रकिनारी फेसाळत्या लाटातून
रेतीत पावले टाकत जाताना
एकाच वेळी पावलांना होणारा
असंख्य रेतकणांचा स्पर्श
हृदयात हळूवरपणे फुलवतात
अनेक तरल भावनांचा
एक सूमधुर ॲार्केस्ट्रा
खवळलेल्या मनाचा समुद्र
हळूहळू शांत होतो
कोमल तरंग उमटू लागतात
खोल अंतरंगात सुध्दा
आणि बाहेरचा कल्लोळ
अचानक स्तब्ध होतो
जणू वाट करून देतो
त्या मंद गीताला
दुरवरून येणारा तो सुरेल आवाज
लाटांतून पायात
आणि पायातून सरळ
हृदयाला भिडू लागतो
कदाचित प्रियकर प्रेयसीला
प्रेयसी प्रियकराला
कोणी मित्र आपल्या हरवलेल्या
मित्राला हाक मारत होते
आसुसलेले ममत्व
पाडसाला शोधत होते
किंवा कोणी मनमोकळेपणाने
उगाच गात होते
कदाचित देवमाशाचे गाणे असावे
मैलोंमैल दुर पसरलेले
त्याचेच जग मोठे असते
भिंती नसलेल्या त्या जगाचे
कायदेच वेगळे असतात
परकेसुध्दा सहजपणे
तेथे आपले होतात
जमिनीवरच्या जगात मात्र
एकसारखे असावे लागतात झेंडे
वेगळ्या रंगात रंगलेले आपलेसुध्दा
होतात बेदखल येथे
©️ShashikantDudhgaonkar
