अखंड सुर्यास्त
निघालो मी दूर तिकडे
जेथे सुर्य उगवत नाही
अंधार नाही, उजेड सूध्दा
तेथे आशा दाखवत नाही
आला वीट आभासांचा
स्वप्ना मागे नव स्वप्नांचा
आशेचे धुणे धुऊन रोज
मळ काही जात नाही
वीटा संपत आल्या येथे
भितीं उंच थांबत नाही
खिडक्यांना बाजारात सध्या
कवडीचेही मोल नाही
बोलण्याचा यत्न करावा
असे येथले कान नाही
ऐकण्याचा भार मात्र
येथला कधी संपत नाही
सुर्य येथे उगवत नाही
अस्त इथला संपत नाही
वांझ रात्रीच्या गर्भातून येथे
पहाट जन्म घेत नाही
