काळाबरोबर बऱ्याच गोष्टींचा ऱ्हास होत चाललाय. काही फोफावत चालल्यात अनिर्बंध. होणारे बदल चुक का बरोबर ह्या बाबतीत स्पष्टता पण नसते. जुने जपावेसे वाटते आणि नवे पण स्विकारावेसे वाटते. पण ते शक्य नसते. कारण आपण एक अविभाज्य भाग असतो. होत चाललेल्या बदलांचा !!
ओसाड गाव
उन आणि उन फक्त
दुरवर पसरलेले
कॅांग्रेस गवता सारखे
न पेरतां उगवलेले
अधेमधे एखादी बेरड बाभळ
जमिनीच्या छातीवर पाय ठेऊन
काटे पेरत राहते
दगडा धोंड्यात
नाही म्हणायला
पाऊस पडतो कधीतरी
पगार झाल्यावर बेवडा
भसाभसा दारू घोटतो तशी
मग संपत नाही सालभर
हातांचा थरथराट
आणि क्वार्टरची आस
रापलेल्या चेहऱ्यावर
बिनलाजे लोंबणारी
माणसांपेक्षा
छप्पर जास्त असलेला गाव
ओस पडत चाललाय
एकटे-दुकटे म्हातारे
राहतात अजूनही
गावाशी इमान राखत
देवळातल्या दिव्याला तेल वाहून
चाकरमानी येण्याची वाट पाहत
सणवारासाठी
कुलूप लावलेली दारे
आणि पडीक रान बघून
कुत्री मांजर आणि उंदीर पण
गायब झालीत
भाड्यावर आणलेल्या
कार्यकर्त्यांसारखी
गावात आजकाल
तसे काहीच घडत नाही
नाही म्हणायला
भर उन्हात
वांझ माळरानावर
उठतात वावटळी
मिनीटभर पण न टिकणाऱ्या
©️ShashikantDudhgaonkar
