पाऊस पडून गेल्यावर
चाकाखालून रस्ता पळत होता
माझा माझ्या मागे
त्यांचा त्यांच्या मागे
डांबर ओतले की वाट दाखवू लागतात
खडी दगड आणि धोंडे
एका पावसात तरूण झालेली झाडे
दृष्टींआड होत होती
ओळख पटे पर्यंत
रस्त्याला होती घाई
का झाडे लाजत होती
नववधू सारखी
पाऊस पाडून मोकळे झालेले ढग
चौखूर उधळले होते
पाठीवरच्या पुस्तकांचे ओझे झटकून दिल्यावर
गवसलेले बालपण निरागसतेने अनुभवणाऱ्या
बालकांसारखे
आणि ओझे असले नसले तरी
वाकलेला मी
धुवून निघालेला आसंमत पुन्हा पुन्हा न्याहाळत होतो
हरवलेला ठेवा
गवसल्या सारखे
