
अव्यक्त
डोक्यात पसरलेले ढग
आणि दाटलेले धुक्यात
दिसत नाही काहीच
स्पष्टपणे
दाटलेल्या अंधारात
हरवलेले शब्द
कुठे लपलेत कळत नाही
बोलायचे असते सांगायचे असते
मनातल्या खदखदीला
बाहेर मोकळे सोडायचे असते
आतल्या आत तिच्या धगीत
जळून जायच्या आत
पण शब्द काही उमटत नाहीत
कंठही फुटत नाही
आणि हताश जिभेला
आवळून धरतात ओठ
आतल्या आत
तरीही डोळे बोलतातच
दाखवत राहतात
मनामधे लपलेले सगळे काही
पण पाहणारे
आणि पाहीलेले उमजणारे
अशा वेळेस कोणीच नसते
दुर्दैवाने आसपास
©️ShashikantDudhgaonkar