अस्वस्थ





अस्वस्थ | Shashikant Dudhgaonkar



अस्वस्थ

आसपास आपल्या
सारे आलबेल असते
सकाळ दुपार सायंकाळ रात्र
नेहमीप्रमाणे येते
आणि जातेही
घडत राहते बऱ्यापैकी
सारे मनासारखे

मात्र कोठेतरी दूर
क्षितीजा पलिकडे
ध्वस्त इमारती
पेटलेल्या आगी
आणि एकाच वेळी
अकाली मारले गेलेल्या आत्म्यांचा
धुमसत असतो धूर

कोण चांगले कोण वाईट
अनेक तज्ञ जोरजोरात खेकसत
डागतात त्यांचे विश्लेषण
बहिऱ्या झालेल्या कानांवर

मी ही ऐकतो निर्विकारपणे
एव्हाना,
मावळत चालला आहे उल्हास
जगा बद्दल

नजरे पल्याडच्या
व्यस्तता का बधीरपणा
स्वार्थ का आत्ममग्नता
माहित नाही

मात्र दूरच्या अस्वस्थते पेक्षा
बरे वाटू लागते
नजिकचे आश्वस्त
खोटे असले तरी

तेंव्हा,
उघड्या पडू लागलेल्या उणिवांची आणि
मर्यादित होऊ लागलेल्या जाणिवांची सल
डोकावत राहते अधूनमधून
एखाद्या बेसावध क्षणी


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading